Saturday, 6 May 2017

शेतकरी संप म्हणजे विषाची परीक्षाच

चिंतामण पाटील
8805221372

एक पीक संपलं की दुसर्‍या पिकाच्या तयारीला लागायचं हि त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मात्र अलिकडे सतत परवडतच नाही असाच अनुभव येत असल्याने जुन्यावर नांगर फिरवून नव्याची पेरणी करायची ताकद त्याच्यात उरलेली नाही. त्यापेक्षा शेती सोडलेली बरी अशा निर्णयापर्यंत तो येऊन ठेपला आहे.

सावधान! विषाची परिक्षा सुरु आहे!! 

जे कधी घडलं नाही ते आता घडू पहात आहे. संघटीत नसल्याने समस्याग्रस्त शेतकर्‍याला टोलवून लावू या भ्रमात राहणार्‍या समाजाला नि शासनाला संपाचा पुकारा करुन शेतकर्‍यांनी गंभीर इशारा दिला आहे. संघटीत नसल्याने शेतकर्‍याकडून संप होणार नाही असे गुप्तचर यंत्रणाचे अहवाल सरकारकडे आले असतील नि त्यावर विसंबून ह्या संपाकडे डोळेझाक करण्याची चूक सरकार करत असेल तर ती गंभीर बाब आहे. कारण आज पुणतांब्यात 40 गावच्या शेतकर्‍यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याचे लोण सगळा महाराष्ट्र व्यापू शकते. पिकवलं तरी हातात पैसा राहात नसेल तर एकदा न पिकवताच काय होतं ते पाहुया. असा संकल्प करुन शेतकरी उतरले आणि त्यामुळे शेती पडून राहिली तर त्यातून होणारे दुष्परिणाम घातक ठरतील. कारण खाद्यान्नाचा 1-2 टक्के तुटवडा झाला तरी त्याची पुर्तता करता करता शासकीय यंत्रणेच्या नाकी नऊ येतात. संपामुळे तुटवड्याचा टक्का वाढला तर मात्र अराजक माजेल. पुणतांब्यात संपाचा निर्धार करण्यासाठी दीड हजार शेतकरी एकत्र आले होते. आपापला फायदा करुन घेणार्‍या शेतकरी संघटना वेगवेगळ्या दिशेने आंदोलन करीत असतांना शेतकरी म्हणून पुणतांब्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या एकत्रीकरणाचं महत्व मोठं आहे. डॉक्टर असोत कि सरकारी नोकर आपल्या मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसून समाजाला नि सरकारला वेठीस धरतात. आपल्या मागण्या मान्य करुन घेतात. हे त्यांना केवळ संघटनेच्या जोरावर जमतं. कारण संपावर गेले तरी त्यांचा पगार बुडत नाही. समस्यांमध्ये बुडालेला शेतकरी आपलं काम बुडवून संघटीत होऊ शकत नाही त्यामुळे आंदोलन किंवा संपही पुकारु शकत नाही. म्हणूनच त्याच्या समस्यांकडे गांभिर्याने पाहिले गेले नाही. विरोधक आरडाओरड करताहेत म्हणून नव्हे तर  त्यांनीच चालवलेल्या कारभाराने शेतकर्‍यांच्या समस्या अधिक गडद झाल्या आहेत. त्यामुळेच विरोधकांच्या आंदोलनात शेतकर्‍यांनी फारसा रस न दाखवता स्वत:च संपाचं हत्यार पुकारलं.   आज वेगवेगळ्या दिशेला शेतकर्‍यांची आंदोलने होत आहेत. त्यातील काही संघटनांची आंदोलने ही राजकीय मजबुरी आहेत. मात्र शेतकरी अडचणीत आहेत ह्याची जाणीव ठेवून हि आंदोलने होत असल्याने त्यातून त्यांना जरी राजकीय फायदा उचलायचा असला तरी ते शेतकर्‍यांचा प्रश्न जगासमोर मांडताहेत ही समाधानाची बाब आहे. 

शेतकरी वाट पहात नाही: 

चालू हंगामात मेहनत करुनही जे पिक परवडत नाही त्या पिकाचा नाद सोडून शेतकरी लगेच पुढच्या हंगामाच्या तयारीला लागतो. हे वर्षानुवर्षाच्या संस्काराचे परिणाम आहेत. एक पिक संपलं की दुसर्‍या पिकाच्या तयारीला लागायचं हि त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मात्र अलिकडे सतत परवडतच नाही असाच अनुभव येत असल्याने जुन्यावर नांगर फिरवून नव्याची पेरणी करायची ताकद त्याच्यात उरलेली नाही. त्यापेक्षा शेती सोडलेली बरी अशा निर्णयापर्यंत तो येऊन ठेपला आहे. त्यामुळे शासन स्तरावर उपाय सुरु होण्याआधी शेतकरी आपापला मार्ग शोधून घेतील. तो मार्ग शेती सोडण्याचा किंवा आत्महत्येचा असेल. म्हणूनच समाज आणि शासनाला समस्येचे गांभिर्य समजावे म्हणून  त्याने संपाचा पुकारा केला आहे. 

शहामृगवृत्ती घातक

संकट पाठीशी लागले असतांना डोळेबंद करुन मातीत तोंड खुपसून पडलेल्या शहामृगासारखे वर्तन घातक ठरु शकेल. तूर खरेदीच्या बाबतीत जे चालले आहे त्यावरुन शासकीय यंत्रणा शेतकर्‍यांच्या बाबतीत गंभीर नाही हे दिसून येते. त्यामुळे पुणतांब्यात गोळा झालेल्या शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपाकडेही कानाडोळा केला जातोय की काय असे वाटू लागले आहे. आज शेतकरी समस्याग्रस्त आहे, मात्र उद्या शेतकर्‍यांचा संप अनंत समस्या निर्माण करु शकतो. इंग्रजांच्या राजवटीत महाराष्ट्रात कोकणातल्या शेतकर्‍यांनी संप पुकारला होता. सहा वर्षे  चाललेल्या या संपाने शेतकर्‍यांसह सगळ्यांचेच हाल केले होते. आज त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा फक्त एका गावाने तो संप पुकारला होता. मात्र पुणतांब्यांने दिलेल्या संपाच्या हाकेला मराठवाड्यातील व खान्देशातील अनेक गावातील शेतकर्‍यांनी ‘ओ’ दिला आहे. जसजसा जून महिना जवळ येतोय तसतसा संपाबाबत शेतकरी जागृत होतांना दिसत आहेत. 15 मे रोजी पुणतांब्यात पुन्हा शेतकरी एकत्र येत आहेत. त्यावेळी संपाबाबत अधिक उलगडा होऊ शकेल. मात्र समाज व शासन सध्या ‘वाट पहा’ धोरण  अवलंबून असल्याने खरोखरच संप सुरु झाला तर ती विषाची परिक्षाच ठरेल.

-चिंतामण पाटील 8805221372